व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

साताऱ्याच्या कन्येची निवड : स्नेहांजली ननावरे भारतीय नौदलात सब लेफ्टनंटपदी

सातारा | येथील खेळाडू स्नेहांजली राजेंद्र ननावरे हिची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट (प्रथम श्रेणी) पदासाठी निवड झाली.त्यासाठी एझीम (केरळ) येथील नौदल अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी तीची निवड झाली आहे. सामान्य कुटुंबातील स्नेहांजलीने आई- वडिलांची क्रीडा परंपरा पुढे चालू ठेवत भारतीय सैन्य दलात उच्चपदावर जाण्याचे स्वप्न आज पूर्ण केले.

कराटे चॅम्पियन असलेल्या आई- वडिलाचा गृह उद्योग आहे. स्नेहांजलीने ‘धनुर्विद्या’ या खेळात राष्ट्रीय पातळीपर्यंत अनेक पदके मिळवली. अभ्यासातही तितकेच लक्ष घातले. तिचे लष्करी अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वेळेचे नियोजन केले. खेळ, व्यायाम आणि अभ्यास याचे वेळापत्रक तयार केले. त्यानुसार मेहनत घेतली. तिची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट या प्रथम श्रेणी अधिकारी पदावर निवड झाली.

तिच्या या यशात आई आरती, वडील राजेंद्र, बहीण राष्ट्रीय खेळाडू ओमश्री यांचा सिंहाचा वाटा आहे. या प्रवासात अनेक शिक्षक, मार्गदर्शकांनी तिला मोलाचे मार्गदर्शन केले. स्नेहांजलीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जॉय चिल्ड्रन्स ॲकॅडमीत, तर महाविद्यालयीन शिक्षण किसन वीर महाविद्यालयात कला शाखेत झाले. बीएमध्ये इंग्रजी विभागात शिवाजी विद्यापीठात तिचा प्रथम क्रमांक आला होता.