हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे माझी महापौर दत्ता दळवी यांना भांडूप पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर टीका करत एकनाथ शिंदे यांच्या विरोधातच गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यांनी केलेल्या या मागणीमुळे ठाकरे गटात आणि शिंदे गटात पुन्हा वादाला तोंड फुटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, “खरं म्हणजे गद्दार ह्रदयसम्राटांनी स्वत:ला हिंदूह्रदयसम्राट म्हणवून घेणे हा वीर सावरकर आणि हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. त्याबद्दल खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यावर बोलत नाही. मी एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल व्हायला हवा असे म्हणत आहे. कारण ते वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंची उपाधी स्वत:ला लावून घेत आहे”
त्याचबरोबर, “दत्ता दळवी यांना आज सकाळी पोलिसांनी घरात घुसून अटक केली. दत्ता दळवी यांचा गुन्हा काय आहे? त्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेच्या लोकभावना या भांडूपमधल्या एका मेळाव्यात व्यक्त केल्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी किंवा त्यांच्याबरोबरचे जे गद्दार हृदयसम्राट आहेत ते स्वतःला हिंदू हृदयसम्राट म्हणवून घेत आहेत. याच्यावर तमाम हिंदूंचा आक्षेप आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, माझी महापौर दत्ता दळवी यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटाने लावला आहे. यासंदर्भात शिंदे गटाकडूनच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.