हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला 1947 ला भीक मिळाली असून खर स्वातंत्र्य 2014 ला मिळालं अस विधान करणाऱ्या कंगना राणावतला पाठिंबा दिल्यानंतर जेष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कंगना आणि विक्रम गोखले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
रविकांत तुपकर म्हणाले, विक्रम गोखलेंसारख्या अतिशय जेष्ठ अभिनेत्यांने कंगना रणावतच्या वक्तव्याचं समर्थन करणे योग्य नाही. इंग्रजांना या देशातून घालवायला अनेकांनी बलिदान दिले. अनेकांनी त्याग केला आणि याच त्यागाच्या- बलिदानाच्या जोरावर स्वातंत्र्य मिळाले आहे. विक्रम गोखले आणि कंगना रणावतवर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे.
कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांच्या डोक्यावर परिणाम झालाय त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज आहे. आमच्या क्रांतिकारकांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. कंगणाच्या वक्तव्याप्रमाणे 2014 ला जर स्वातंत्र्य मिळाले असेल तर भविष्यात मोदी सरकार आले नाही तर आपण पुन्हा पारतंत्र्यात जाणार आहोत असं यांना म्हणायचं आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.