मुंबई । उत्तर प्रदेशसह देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या कुख्यात गँगस्टर विकास दुबेचं आयुष्य वेब सीरिजच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. . या वेब सीरिज दिग्दर्शन अलिगढ, ओमेर्ता, शहीद आदी चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता करणार आहेत. निर्माता शैलेश आर. सिंग यांच्या कर्मा मीडिया आणि एंटरटेनमेंटने पोलॉरॉईड मीडियाच्या सहकार्यानं या वेब सीरिजचे हक्क विकत घेतले आहेत.
कानपूरमध्ये झालेल्या चकमकीत आठ पोलिसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या विकास दुबेला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला कानपूरला घेऊन जात असतानाच पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला. त्यानंतर विकास दुबेनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे विकास दुबेनं पोलिसांकडील पिस्तुल हिसकावून गोळीबार केला. या चकमकीत विकास दुबे ठार झाला.
या वेब सीरिजबद्दल माहिती देताना हंसल मेहता म्हणाले, ” गँगस्टर विकास दुबे हा आपल्या काळातील आणि आपल्या व्यवस्थेचं प्रतिबिंब आहे. जिथे राजकारण, गुन्हेगार आणि लोकप्रतिनिधी एकमेकांशी संबंध ठेवतात. याकडे बघण्याच्या दृष्टीकोनाबद्दल चर्चा करणं घाईचं होईल, पण जबाबदारीनं याकडे बघणार आहे. यात मला एक भडक राजकीय थ्रिलर दिसतो आहे. त्यामुळे ही कहाणी सांगणं रंजक असणार आहे.”
तर निर्माते शैलेश सिंह या सीरिजविषयी बोलताना म्हणाले,” मी ही घटना वृत्तवाहिन्या आणि इतर माध्यमातून जवळून पाहत आहे. ८ पोलिसांच्या हत्येमुळे देश हादरला आणि विकास दुबेला शोधण्यात आलं. ७ दिवसांच्या शोधअभियानानंतर त्याला चकमकीत ठार करण्यात आल्याचं मी पाहिलं. त्यामुळे मला वाटलं की ही कहाणी देशाला का नये सांगू. काही वास्तविक सत्ये समोर का आणू नयेत. ही गोष्ट सांगण्यासाठी तिच्या खोलात का जाऊ नये. ही कहाणी सांगण्यासाठी उत्सुक आहे आणि त्या दृष्टीनं तिच्याकडे पाहत आहे,” असं सिंह म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”