मुंबई प्रतिनिधी । राज्यातील सत्तानाट्य अंतिम अंकावर येऊन ठेपल आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आता फायनल बैठक मुंबईत होत आहेत. या बैठकीत तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित आहेत. खातेवाटप आणि सत्तेची गणित या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहेत. त्याअनुषंगाने या अंतिम बैठकीत मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब होणार आहे.
शिवसेनेची आधीपासून मुख्यमंत्रीपदाची मागणी राहिलेली आहे. याच मुद्यावरून भाजपाशी सेनेने फारकत घेतली होती. त्यामुळे आघाडीसोबत सत्तास्थापन करताना मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे आता निश्चित झालं आहे. मात्र, शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाची कमान कोण सांभाळणार यांबाबतची नाव आता आता समोर येत आहेत. शरद पवार यांची पहिली पसंती शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, इतक्या दिवसांत उद्धव यांनी कधीही मुख्यमंत्री पदाबाबत खुलासा केलेला नाही. जर उद्धव यांनी मुख्यमंत्रीपद नाकारलं तर संजय राऊत यांची वर्णी या पदावर होऊ शकते याबाबत आता जोरात चर्चा सुरु झाली आहे.
संजय राऊत आतापर्यंतच्या सत्ताबोलणीत आघाडीवर राहिलेले आहेत. त्यामुळं राऊत मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊ शकतात. तसेच शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांचे नाव सुद्धा चर्चेत आहे. त्यामुळं शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे जरी निश्चित असले तरी उद्धव सत्तेचा रिमोट आपल्या हातात ठेवतात कि स्वतः सरकारचे सूत्रसंचालन करतात यावर आता सर्वांचे लक्ष लागून आहे.