जालना- जळगाव रेल्वेमार्गाचे आजपासून अंतिम सर्वेक्षण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – जालना-जळगाव रेल्वेमार्गाच्या अंतिम सर्वेक्षणासाठी मध्य रेल्वेचे अधिकारी आज जालना येथे दाखल होणार आहेत.

या मार्गाच्या अंतिम लोकेशन सर्वेक्षणासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आठ फेब्रुवारीला मंजुरी दिली होती. हा 174 किलोमीटरचा मार्ग असून सर्वेक्षणासाठी सुमारे साडेचार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सर्वेक्षणाचे काम तातडीने मार्गी लावण्याची सूचना दानवे यांनी संबंधित विभागाला केली होती. त्यानुसार मध्य रेल्वेचे अधिकारी 23 ते 25 मार्चदरम्यान सर्वेक्षण करतील. अधिकाऱ्यांच्या पथकामध्ये मुंबईतील श्रीमती व्ही.नलिनी, रविप्रकाश गुजराल व मुकेश लाल यांचा समावेश आहे. जालना येथील ड्रायपोर्ट, औद्योगिक क्षेत्रातील स्टील व बियाणे कंपन्यांना भेट, जिल्हा उद्योग केंद्र, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांचे येथील कार्यालय, तहसील कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी ठिकाणी पथक बुधवारी भेट देईल. गुरुवारी श्रीक्षेत्र राजूर गणपती, भोकरदन तहसील कार्यालय, भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समिती, सिल्लोड बसस्थानक, सिल्लोड तहसील कार्यालय, सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती, शुक्रवारी जळगाव जिल्ह्यात विविध कार्यालये, औद्योगिक वसाहतीला पथक भेट देईल.

मराठवाड्यासाठी लाभदायी मार्ग –
जालना-जळगाव रेल्वे मार्गामुळे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, शेती, व्यापार, लघुउद्योग, पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. जालना येथून पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोड मार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, जळगाव असा हा मार्ग असून ७० टक्के तो लोकसभेच्या जालना क्षेत्रातून जाईल. त्याच्या फायदा पुढे गुजरात, राजस्थानच्या गाड्यांना आंध्रप्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठी छोटा मार्ग म्हणून होणार आहे.

Leave a Comment