जालना : मोसंबीचा मंजूर फळपीक विमा मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एचडीएफसी एर्गो विमा कंपनीच्या कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन तिसऱ्या दिवशी ही सुरू होते.एचडीएफसी एग्रो कंपनीकडून येत्या १० दिवसात विमा शेतकऱ्यांना देण्यात येईल,असे लेखी आश्वासन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एस.रणदिवे यांच्या हस्ते देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
जालना जिल्ह्यात मोसंबी फळपिकाचा ३८ कोटी २१ लाख ८६ हजार रुपये मंजूर झाला आहे.मात्र अद्याप ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला नाही.त्यामुळे जोपर्यंत विमा मिळत नाही.तोपर्यंत कार्यालयातून हटणार नाही,अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांसह या कंपनी कार्यालयात मुक्काम आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी लेखी पत्रानंतर मुक्काम ठोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
या ठिकाणी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एस.रणदिवे यांनी भेट देऊन एचडीएफसी एर्गो विमा कंपनीच्या कारभाराची चौकशी केली. त्यांना विमा कंपनी कडून कोणतीही ठोस माहिती मिळाली नसल्याने त्यांनी विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. त्यांनी विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यास किती शेतकऱ्यांनी अंबिया बहार फळपीक विमा भरला? राज्य सरकार व केंद्र सरकारचा हिस्सा किती जमा झाला? आतापर्यंत किती रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली? आदी प्रश्नांची उत्तरे कंपनी कर्मचाऱ्यास देता न आल्याने कंपनीस कारवाई करण्यात येईल असे पत्र बुधवार ( ता १) दिले होते.
यावेळी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी एस रणदिवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे,विमा कंपनी प्रतिनिधी आरेफ शेख,पांडुरंग गटकळ, विध्यार्थी आघाडी चे गणेश गावडे, अभिजित काळे,युवानेते विष्णू नाझरकर, जेष्ठ नेते बाबासाहेब दखणे,अंकुश तारख,भारत उंडे,संतोष जैन शास्त्री,सुनील गायकवाड,धर्मराज अनपट, धनंजय गोरे,अनिल सावंत,सतीश उंडे,लक्ष्मण पिसोरे,विश्वास तारगे,बाळासाहेब गिरी,बंडू शिंगटे,अर्जुन वारंगे,अशोक गायकवाड, लक्ष्मण उघडे,वसीम शेख,आदींची उपस्थिती होती
एचडीएफसी एर्गो विमा कंपनीस शासनाच्या अनुदानाचे ६ कोटी ६६ लाख रुपये मिळणे बाकी आहे. मात्र या रक्कमेसाठी विमा कंपनीने शेतकऱ्यांचे ३८ कोटी २१ लाख रुपये अडवून धरले आहे. हे कृषी आयुक्तांच्या पत्रावरून स्पष्ट होत आहे. या आंदोलनास काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्संग मुंडे,डॉ रमेश तारगे,कॉ देविदास जिगे यांच्या सह अनेक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या.