आषाढी एकादशी सोहळा: माउली, तुकोबांच्या पादुकांना पंढरपूरला एसटीने नेण्यावर अखेर शिक्कामोर्तब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । पुणे जिल्ह्यातील देहू येथून जगत् गुरु संत तुकाराम महाराज यांची आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला एसटी बसने नेण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, यासाठी प्रशासनाने काही अटी आणि नियम घालून दिले आहेत. एसटी बसमध्ये २० जण बसल्याची परवानगी असून फिजिकल डिस्टसिंग पाळले जाणार आहे. दोन्ही संतांच्या पादुका या पारंपरिक रस्त्याने ३० जून दशमीला मार्गस्थ होणार आहेत.

पुणे जिल्ह्यातून संतांच्या पादुकांना अटी आणि कार्यपद्धती अवलंबून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी तर संत तुकाराम महाराज संस्थान, देहु तसेच संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड आणि चांगावटेश्वर देवस्थान, सासवड यांना पंढरपूर येथे एसटी बसने पादुका घेऊन जाण्यास परवानगी मिळालेली आहे. बसमध्ये २० व्यक्तींना जाण्याची परवानगी दिलेली असून ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना परवानगी नाही. पादुकांसोबत जाणाऱ्या व्यक्तींची कोविड टेस्ट करण्यात येणार आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होईल याची दक्षता घेण्याबाबतही विभागीय आयुक्तांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे. संतांच्या पादुका असलेले वाहन प्रवासात कोठेही दर्शनासाठी थांबवण्यात येणार नाही, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूच्या संकटामुळे या वर्षीचा पालखी सोहळा अगदी सध्या पद्धतीने होत आहे. दरवर्षी पालखी सोहळ्यादरम्यान तुकोबा-माऊलींच्या गजराने आळंदी आणि देहू नगरी दुमदुमून जायची. मात्र, यावर्षी अगदी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत १२ आणि १३ जूनला पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. मात्र, दोन्ही संतांच्या पादुका या पंढरपूरकडे एसटी बस की हेलिकॉप्टर मधून जाणार याबाबत निर्णय होत नव्हता. आता अखेर प्रशासनाने एसटी बसने पादुका नेण्याची परवानगी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment