जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी घरी येऊन केलेला अपमान मनाला लागल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केली आहे. मृत तरुणाने या फायनान्स कंपनीकडून एक महागडा मोबाईल फोन हफ्त्यांवर खरेदी केला होता. त्याच्या कर्जाचे हफ्ते थकल्यामुळे मंगळवारी सायंकाळी फायनान्स कंपनीचे काही वसुली कर्मचारी मृताच्या घरी आले व त्यांनी दुचाकी घेऊन जाण्याची धमकी दिली. कर्मचाऱ्यांनी केलेला अपमान सहन न झाल्याने या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
आत्महत्या केलेल्या 29 वर्षीय तरुणाचे नाव आशुतोष पाटील असे आहे. तो जळगावातील योगेश्वरनगर या ठिकाणी राहत होता. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास त्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
आशुतोष याने काही दिवसांपूर्वी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन एक महागडा मोबाईल फोन खरेदी केला होता. पण आर्थिक अडचणींमुळे तो कर्जाचे हफ्ते देऊ शकला नाही. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी फायनान्स कंपनीचे काही वसुली कर्माचारी आशुतोषच्या घरी आले व त्यांनी हफ्ते न भरल्यास दुचाकी उचलून घेऊन जाण्याची धमकी दिली. या दरम्यान आजूबाजूचे लोकसुद्धा या ठिकाणी जमले होते. फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घरी येऊन केलेला अपमान सहन न झाल्याने आशुतोष मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यावेळी आशुतोषचे वडील हॉटेलवर तर आई बाहेर गेली होती. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.