Sunday, June 4, 2023

फोन टॅपिंग प्रकरणी IPS रश्मी शुक्ला यांच्याविरोधात FIR दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी रश्मि शुक्ला यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शुक्ला यांच्या विरोधात अवैध पद्धतीने फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात टेलिग्राफ एक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पांडे यांच्या समितीने अहवाल दिल्यानंतर राज्य सरकारच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झालाय. रश्मी शुक्ला राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी बेकायदेशीर फोन टॉपिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग करून पोलिसांच्या बदल्या-नियुक्त्यांशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे उघड केल्याचा ठपका आहे. नाना पटोले यांचे बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅप केल्या प्रकरणात एफआयआऱ दाखल झाली आहे. भाजप सरकारच्या काळातील हे फोन टॅपिंग प्रकरण आहे.

याआधीच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या घोषणेनुसार फोन टॅपिंग प्रकरणात चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्रिसदस्यीय समितीने या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले. पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेत समितीची नेमणूक करण्यात आली होती