सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
वाल्मिकीनगर, पाचगणी, ता. महाबळेश्वर येथील गादीच्या गोदामाला आज दुपारी दीडच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या घटनेत गादी तयार करण्याचे सुमारे साडेतीन ते चार लाखांचे साहित्य जळून खाक झाले. पाचगणी पालिकेचा बंब व पालिका कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबात अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील कामगारांनी काही महिन्यापूर्वी पाचगणीतील वाल्मिकीनगरमध्ये मंदिरा शेजारीएक पत्र्याचे शेड भाड्याने घेतले आहार. त्यामध्ये त्याच्याकडून गादी बनविण्याचे काम केले जात. दरम्यान, सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास या गोदामाला अचानक आग लागली. आग लागल्यानंतर आगीच्या धुराचे लोट परिसरात सर्वत्र पसरले. त्यानंतर त्या ठिकाणी परिसरात राहणाऱ्या सिकंदर बागवान व अमिन चौधरी यांनी याची माहिती तत्काळ पाचगणी अग्निशमन नियंत्रण कक्षाला दिली.
माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पालिका कर्मचारी व अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल आले. गादीचा फोम व प्लास्टिक माल असल्याने काही क्षणातच आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. पालिकेचे कर्मचारी सुर्यकांत कासुर्डे, जगदिश बगाडे,आबू डांगे, बाबुराव झाडे,सागर बगाडे व स्थानिक युवकांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. अचानकपणे लागलेल्या आगीमध्ये गोदामात असलेले सुमारे साडेतीन ते चार लाखांचे साहित्य जळून खाक झाले.