सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
मांज्यामध्ये अडकलेल्या एका पारवळाची मनपा अग्निशमन विभाग, वीज मंडळ आणि प्राणी मित्रांकडून सुटका करण्यात आली. अर्धा तास रेस्क्यू करीत या सर्वानी या पारवळास जीवदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले. महापालिकेच्या मंगलधाम इमारतीसमोरील एका झाडावरील मांज्यामध्ये एक पारवळ अडकल्याची माहिती नागरिकांनी महापालिका अग्निशमन विभागाला दिली.
यावेळी अग्निशमन अधिकारी विजय पवार आणि त्यांची टीम तातडीने दाखल झाली. यावेळी वीज मंडळाला बोलावून तात्पुरता वीज पुरवठा खंडित केला. झाड उंच असल्याने महापालिकेच्या वीज मंडळाच्या क्रेनला पाचारण करण्यात आले. यावेळी प्राणीमित्र मुस्तफा मुजावर आणि मंदार शिंपी यांनी क्रेन बकेट मधून वरती जात मांज्याच्या दोर्यात अडकलेल्या पारवाळाची सुटका केली.
मांज्या तोडल्यानंतर लगेच अडकलेले पारवळ नैसर्गिक अधिवासात निघून गेले. मात्र यासाठी अर्धातास झालेले रेस्क्यू ऑपरेशन झाले. हे पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी नेचर कॉनसर्व्हेशन सोसायटी आणि इंसाफ फौंडेशनचे तबरेज खान, मुस्तफा मुजावर, मंदार शिंपी, आदित्य पाटील, राहुल पवार यांनी सहभाग घेतला.