राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर; पहा कोणाकोणाला मिळाली संधी??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election) अवघे काही दिवस राहिले असताना आज शरद पवार गटाकडूच म्हणजेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये शरद पवार गटाने पहिल्या पाच जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यानुसार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना बारामतीतून, अमोल कोल्हे (Amol kolhe) यांना शिरुर येथून, तर निलेश लंके (Nilesh Lanke) यांना नगरमधून तिकीट देण्यात आले आहे. परंतु नितेश कराळे वर्धातून उभे राहण्यासाठी इच्छुक असताना देखील त्यांना तिकीट देण्यात आले नाही. त्याऐवजी वर्धा मतदारसंघातून अमर काळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

1) वर्धा मतदारसंघातून अमर काळे यांना उमेदवारी जाहीर

2) दिंडोरी मतदारसंघातून भास्करराव भगरे यांना उमेदवारी जाहीर

3) बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर

4) शिरुर मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर

5) अहमदनगर मतदारसंघातून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर

शरद पवार गटाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यामुळे सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातून उभ्या राहतील हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. मुख्य म्हणजे, ही यादी जाहीर झाल्यानंतर आणखीन एक यादी जाहीर करण्यात येईल अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे या दुसऱ्या यादीत कोण कोणत्या नेत्याला कुठून उमेदवारी देण्यात येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

साताऱ्यातील सस्पेन्स कायम…

आज जाहीर झालेल्या पहिला यादीत शरद पवार गटाकडून साताऱ्यामधून कोणाला उभे करण्यात येईल हे घोषित करण्यात आलेले नाही. त्यामुळे पहिल्या यादीतून शरद पवार गटाने साताऱ्याचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. कारण की, आता साताऱ्यातून लढण्यास श्रीनिवास पाटील यांनी पवार गटाला नकार दिला आहे. त्यामुळे साताऱ्यातून कोणत्या उमेदवाराला तिकीट देण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आता दुसऱ्या यादीमध्ये साताऱ्यातील उमेदवाराची घोषणा करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.