औरंगाबाद – पत्नीला माहेराहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत तिचा शारिरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक कार्यालयातील सहायक फौजदार सास-यासह पाच जणांविरुध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 जुलै ते 26 नोव्हेंबर 2021 या काळात घडल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे.
पोलिस उपअधीक्षकांच्या वाहनाचा चालक अशोक रामचंद्र महाले यांचा मुलगा शुभम अशोक महाले (रा. सुधाकरनगर, पोलिस वसाहत हाऊसिंग सोसायटी) याने पत्नीला माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणत तिला मारहाण व शिवीगाळ करुन घराबाहेर हाकलून दिले. तसेच पैसे आणल्याशिवाय घरात येऊ नको असे म्हटल्यामुळे विवाहिता माहेरी निघून गेली. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये महिला तक्रार निवारण कक्षात विवाहितेने पती शुभम महाले, सहायक फौजदार सासरे अशोक रामचंद्र महाले, दिर सागर अशोक महाले आणि सासूविरुध्द तक्रार अर्ज दिला होता.
मात्र, महिला तक्रार निवारण कक्षात तडजोड न झाल्यामुळे विवाहितेने सातारा पोलिस ठाणे गाठत महाले कुटुंबियांविरुध्द तक्रार दिली आहे. त्यावरुन सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक शंकर शिरसाठ करत आहेत.