हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. पण ठाकरेंच्या या सभेला परवानगी मिळणार का? असा प्रश्न उपस्थितीत केला जाऊ लागला आहे. कारण त्यांच्या सभेला आता पाच संघटनांनी विरोध दर्शविला आहे. तसे पत्रही संघटनांनी पोलीस आयुक्तांना पाठवले आहे.
राज ठाकरे यांच्याकडून सध्या सभा घेत महाविकास आघाडी सरकारवर चांगलाच निशाणा साधला जाऊ लागला आहे. औरंगाबादमध्ये ठाकरेंच्या सभेसाठी तयारी सुरु केली असताना दुसरीकडे या सभेला विरोध केला जात आहे. औरंगाबादमध्ये रमजानचा महिना आणि कायदा-सुव्यवस्था अशा मुद्यांवरून पाच सामाजिक संघटनांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली असून त्यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे.
‘या’ संघटनांनी केला आहे सभेला विरोध
औरंगाबादमध्ये १ मे रोजी घेतल्या जाणाऱ्या राज ठाकरेंच्या जाहीर सभेला पाच संघटनांनी विरोध केला आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडी, प्रहार संघटना, मौलांना आझाद विचार मंच, गब्बर ॲक्शन संघटना, ऑल इंडिया पँथर सेना या पाच संघटनांचा समावेश आहे.
सभेबाबतचा अद्याप निर्णय नाही
औरंगाबाद या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या सभेकडे लागून राहिले आहार. या सभेत राज ठाकरे काय बोलणार? कुणावर निशाणा साधणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या सभेसाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात सभेला परवानगी मिळावी यासाठी निवेदन दिले आहे. त्यानंतर पोलीस आयुक्त, दोन पोलीस उपायुक्त आणि सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्या परिसरातील पोलीस निरीक्षक यांची बैठकही झाली आहे. मात्र, ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्याबाबत अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही.