कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड सोसायटी गटात दुपारी तीन वाजेपर्यंत 100 टक्के मतदान झाले. सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दुपारनंतर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सहकार पॅनेलच्या १० जागा विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कराड सोसायटी मतदारसंघातील उमेदवार आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पाच वाजेपर्यंत बॅंकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात शंभर टक्के मतदान होईल अशी अपेक्षा असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधन झाले आहे.
यावेळी मंत्री पाटील यांनी जावळी मतदारसंघात झालेल्या वादाबाबत मत मांडले. ते म्हणाले की, जावळीमध्ये सकाळी किरकोळ वाद झाला. मात्र, तो वाद मिटला असून ज्यांनी वाद केला ते दोघे दुपारनंतर एकत्र वावरत होते. सहकार पॅनेलच्या आतापर्यंत 21 पैकी 11 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. त्या दहा जागा ही चांगल्या मताने निवडून येतील.
https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/424839042588191
यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, ॲड. उदयसिह पाटील, डॉ. सुरेश भोसले, माजी जिल्हा अपरिषद सदस्य भीमरावदादा पाटील, मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषद शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी आमदार आनंदराव पाटील, बाजार समितीचे उपसभापती विजयराव कदम यांच्यासह सोसोयटी घाटातील एकूण 140 मतदारांपैकी सर्वजणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.