लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या उंब्रजच्या युवकास सक्तमजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या उंब्रज येथील युवकास वीस वर्षे सक्त मजुरी व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश के. एस. होरे यांनी सुनावली. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे जिल्हा सहाय्यक सरकारी वकील अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली.

याबाबत अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी सांगितले की, संशयिताने पीडित अल्पवयीन मुलीस 2019 मध्ये पळवून नेले होते. त्यानंतर तिला कधी दुचाकीवरून तर कधी रेल्वेने मित्रांच्या मदतीने फिरवून लग्राचे आमिष दाखवले होते. ठाणे, मुंबई, ऐरोली येथे नेऊन संबंधित अल्पवयीन मुलीबरोबर शरीर संबंध ठेवले होते. सुमारे दीड महिना एकत्रित राहून त्यांनी नवरा बायको प्रमाणे संबंध ठेवले होते. त्यानंतर संशयिताने अल्पवयीन मुलीला अलाहाबाद या ठिकाणी रेल्वेने घेऊन जात असताना एका व्यक्तीने संबंधित मुलीस असे करणे योग्य नसल्याचे सांगत समजावून सांगितले. त्यानंतर ठाणे येथे रेल्वे स्थानकात संशयित व संबंधित मुलीस पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना उंब्रज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून याबाबतचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयात खटला सुरू असताना सरकार पक्षातर्फे अँड. राजेंद्र सी. शहा यांनी नऊ साक्षीदार तपासले, तसेच पीडित मुलीचा जवाब, तपासी अंमलदार व पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सहकार्यानुसार न्यायालयात पुरावे सादर केले. त्यानंतर न्यायालयाने सरकार पक्षातर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून संशयित युवकास विविध कलमान्वये वीस वर्षे सक्त मजुरी व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.