वनविभागाची कारवाई : कराडला शिकारीसाठी वाघरी लावणाऱ्या दोघांना अटक

कराड | जखिणवाडी (ता. कराड) येथे वनक्षेत्राच्या लगत शिकार करताना दोघांना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे. वनविभागाने शुक्रवारी (दि. 7) रात्री 10 च्या सुमारास ही कारवाई केली आहे. संशयितांनी शिकारीसाठी तीन वाघरी लावल्या होत्या. यापैकी एका वाघरीमध्ये मृतावस्थेत ससा आढळला आहे. संतोष शिवाजी बनसोडे (वय 21, रा. बाबाजीनगर, जखिणवाडी), पांडुरंग धोंडीराम नाईक (रा. भोसले कारखाना, जखिणवाडी, ता. कराड) असे अटक करण्यात आलेली आरोपींची नावे आहेत.

याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री (दि. 7) जखिणवाडी राखीव वनक्षेत्राच्या लगत खाजगी क्षेत्रात मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनक्षेत्रपाल टी. डी. नवले, वनपाल मलकापूर, वनपाल ए. पी. सवाखंडे, वनरक्षक आर. एन. जाधवर, ए. एस. सोळंकी, ए. व्ही. पाटील, यु.एम. पांढरे, योगेश बडेकर असे सर्वजण मिळून जखिणवाडी लगतच्या खाजगी क्षेत्रात रात्री 8 वा. च्या सुमारास गस्त करीत असताना, वेगवेगळ्या तीन ठिकाणी वाघरी लावलेले आढळले. तीन ही वाघरींची पाहणी केली असता त्यातील एका वाघरी मध्ये ससा (मादी) -1 मृत अवस्थेत अडकलेली दिसली. त्यानंतर आजुबाजूच्या परिसरामध्ये पाहणी केली असता, तेथे एका ठिकाणी बांयडींग तारेची फासकी लावलेली आढळली. उर्वरीत दोन मोकळ्या वाघरी व बांयडिंग तारेची फासकी काढून ताब्यात घेतली.

ज्या वाघरीत ससा अडकला होता, त्या वाघरीच्या परिसरात वरील सर्व वन अधिकारी कर्मचारी दबा धरून बसले होते. त्यानंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सदर वाघरीकडे दोन व्यक्ती हातातील बॅटरी घेवून येत असताना दिसले. त्या दोन्ही व्यक्तींनी वाघरीतील मृत ससा काढून घेवून जात असताना त्यांच्यावर धाड टाकून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी संतोष शिवाजी बनसोडे (वय 21 वर्षे सध्या रा. बाबाजी नगर, जखीणवाडी ता. कराड), पांडूरंग धोंडीराम नाईक मुळ (रा. पोहाळवाडी ता. पन्हाळा जि. कोल्हापूर (सध्या रा भोसले कारखाना, जखीणवाडी ता कराड), वरील दोन्ही आरोपींकडून वाघरी 3 नग, बायडिंग तारेची फासकी- 1 नग जप्त करुन मृत सशाला ताब्यात घेतले सदर प्रकरणाचा पुढील तपास सातारा वनविभाग उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली सातारा सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, कराडचे वनक्षेत्रपाल तुषार नवले, हे करीत आहेत.