सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
वाई तालुक्यातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्यावतीने नुकतीच एक कारवाई करण्यात आली. ती म्हणजे ओझर्डे गावच्या हद्दीत ओझर्डे ते सोनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला शेडमध्ये सात जणांकडून साळींदर या प्राण्याची शिकार करून पार्टी केली जात होती. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. तसेच संबंधिताना ताब्यात घेत असताना एका आरोपीने पलायन केले. दरम्यान इतर सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाई तालुक्यातील ओझर्डे गावच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या घटना घडत आहेत. अशा घटना घडू नये म्हणून वन विभागातील अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ओझर्डे ते सोनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला शेडमध्ये सहा जणांकडून वन्य प्राण्यांशी शिकार करून पार्टी केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वन अधिकाऱ्यांच्या पथकाने त्या ठिकाणी अचानक धाड टाकली.
वन अधिकाऱ्यांच्या पथकाने रात्री पार्टीवर धाड टाकताच त्या ठिकाणी आरोपी भरत सुरेश जाधव (वय ३२), महेश अशोक साळुंखे (वय २८), गणेश अर्जुन कारंडे (वय ३०), सोमनाथ काळू पवार (वय ४७), नितीन अरुण गायकवाड (वय २६) व आरोपी मनोज नारायण घोरपडे (वय ३९) (सर्व रा. ओझर्डे, ता. वाई, जि. सातारा) हे सर्वजण साळींदर वन्यप्राण्याचे मांस जर्मलच्या पातेल्यामध्ये शिजवून पार्टी करीत होते. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी कारवाई केली.
तसेच पंचनामा करुन मुद्देमाल जप्त करते वेळी आरोपी मनोज नारायण घोरपडे याने अंधाराचा फायदा घेवून पलायन केले. पोलिसांकडून त्याचा शोध केला जात आहे. दरम्यान संबंधित आरोपींवर वन्यजीव (सरंक्षण) अधिनियम, १९७२ चे कलम ९, ३९, ५०, ५१ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वन अधिकाऱयांनी आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी साळींदर वन्यप्राण्याचे मांस हे दिपक ज्ञानेश्वर चव्हाण (रा. कणूर, ता. वाई जि. सातारा) यांनी आणून दिल्या आहे, असे सांगितले.
या प्रकरणी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले याच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वाई स्नेहल मगर, वनपाल भुईज संग्राम मोरे, वनपाल वाई सुरेश पटकारे, वनरक्षक वाई वैभव शिंदे, वनरक्षक जांभळी संदिप पवार, वनरक्षक वडवली रामेश्वर भोपळे यांनी कारवाई केली आहे.