Wednesday, October 5, 2022

Buy now

काय सांगता! सचखंड एक्सप्रेसचा आरक्षित डबाच विसरला

नांदेड – नांदेडहुन अमृतसर धावणाऱ्या सचखंड एक्सप्रेस ला काल सकाळी एक आरक्षित डबा जोडण्याचा विसर प्रशासनाला पडला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वे पटरी वरच आंदोलन केले. त्यामुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. आपली चूक लक्षात आल्यानंतर रेल्वेने पुन्हा तो डबा जोडला. त्यानंतर प्रवासी भाविक अमृतसर कडे रवाना झाले.

नांदेड मध्ये होळीनिमित्त सचखंड गुरुद्वाराच्या वतीने नगर कीर्तन काढण्यात येते. तसेच इतरही धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यासाठी देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात दरवर्षी भाविक नांदेडात येतात. कोरोनामुळे दोन वर्ष ही संख्या कमी झाली होती. परंतु यंदा निर्बंध शिथिल केल्यानंतर मोठ्या संख्येने भाविक नांदेडात दाखल झाले होते. धुळवडीचे कार्यक्रम आटोपल्यानंतर सचखंड एक्सप्रेस ने भावी दिल्ली आणि अमृतसर येथे जाण्यासाठी निघाले होते. परंतु काल सकाळी गाडीला एस 9 हा आरक्षित डबा जोडण्याचा विसर रेल्वे प्रशासनाला पडला. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी ही बाब रेल्वे अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. परंतु त्यांच्याकडून समाधान उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे शेवटी प्रवाशांनी पटरी वरच आंदोलन करण्यास सुरुवात केली.

आरपीएफ कार्यालयासमोर उभी असलेली सचखंड एक्सप्रेस प्रवाशांनी रोखून धरली. जोपर्यंत गाडीला एस 9 हा डबा जोडणार नाही तोपर्यंत ती गाडी पुढे जाऊ देणार नाही असा पवित्रा घेण्यात आला. त्यानंतर हा डबा जोडून गाडी अमृतसरकडे रवाना करण्यात आली होती. या सर्व गोंधळामुळे ही गाडी काल दीड तास उशिराने म्हणजेच सकाळी साडेदहा वाजता नांदेड रेल्वे स्थानकावरुन सोडण्यात आली. या प्रकारामुळे रेल्वेस्टेशनवर मोठा गोंधळ उडाला होता.