सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सुरूर (ता. वाई) येथे हॉटेल साईपार्क येथे अल्पोपाहारासाठी थांबलेल्या प्रवाशांची विसरलेली 10 तोळे सोन्याचे दागिने मालकाकडून प्रामाणिकपणे परत देण्यात आले. हाॅटेल मालक सुधीर यादव यांच्या या प्रामाणिकपणाचे परिसरातून कौतुक होत आहे. नातेवाईकांच्या विवाहासाठी निघालेल्या कुटुंबाचे 10 तोळे सोने हाॅटेलमध्ये विसरले होते.
पुणे- बंगलोर महामार्गावर सुरूरच्या हद्दीत हॉटेल साई पार्क इन येथे आज सकाळी नाकोडा ट्रॅव्हलची बस अल्पोपाहारासाठी थांबली होती. यातील प्रवासी प्रतीक कृष्णा कंबळकर (रा. बालाजी कॉलेज जवळ, पुणे) हे नातेवाइकांच्या विवाहासाठी पत्नी, आई व मित्रांसह कोल्हापूर येथे चालले होते. हॉटेलमध्ये नाष्टा केल्यानंतर त्यांच्याजवळ असणारी प्रवासी बॅग हॉटेलमध्येच विसरले. या बॅगेत दहा तोळे सोने, घड्याळ व अन्य किमती वस्तू होत्या. सापडलेल्या बॅगेत किमतीऐवजी असल्याची माहिती मिळाल्यानंतर हॉटेलचे मालक व गुळंब येथील सुधीर यादव यांनी सीसीटीव्हीच्या आधारे बॅगेचे मालक व ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत संपर्क साधण्यास यशस्वी झाले. रात्री उशिरा बॅगेचे मालक कोल्हापूर येथून हॉटेल साई पार्क इनवर आले व त्यांनी त्यांची बॅग सुरक्षित असल्याची खात्री केली.
त्यानंतर हॉटेल मालक यादव यांनी भुईंज पोलिस ठाण्यात येऊन सापडलेली बॅग व अन्य वस्तू सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या स्वाधीन केल्या. यादव यांचा प्रामाणिकपणा व स्वच्छ हेतू याचे कौतुक करत सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांनी शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. यावेळी निरीक्षक रत्नदीप भंडारे, सहायक फौजदार विकास गंगावणे, हवालदार सुनील पोळ, सचिन नलवडे, दत्तात्रय गायकवाड, दीपक गिरी गोसावी आदी सहायक पोलिस उपस्थित होते.