कल्याण : हॅलो महाराष्ट्र – भाजपचे माजी नगरसेवक सचिन खेमा यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. त्यांना कल्याणच्या विशेष मोक्का न्यायालयाने 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सचिन खेमा यांच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात खंडणी, प्राणघातक हल्ला यासह आठ गुन्हे दाखल आहेत.
काय आहे नेमके प्रकरण ?
3 जानेवारी रोजी रात्री 11.30 ला सचिन खेमा याने कल्याणमधील भूषण जाधव याला शिवसेनेचे पदाधिकारी अरविंद मोरे यांच्याबरोबर फिरतो म्हणून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली होती. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात सचिन खेमा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या प्रकरणातील साक्षीदार असलेले व्यापारी अमजद सय्यद याला धंदा चालू ठेवायचा असेल तर पाच लाख रूपये दे अशी खंडणीची धमकी देत त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यावेळी सचिन खेमा याच्यासोबत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्यांप्रकरणी सचिन खेमा याच्यासह अजून एकाला अटक करण्यात आली होती.
भाजपला धक्का
या दरम्यान सचिन खेमाच्या सुटकेसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. सचिन खेमा याच्यासह अन्य दोन नगरसेवकांना सत्ताधारी शिवसेनेने जाणीवपूर्वक अडकवल्याचा आरोप करत भाजपने शनिवारी राज्य सरकारविरोधात अप्पर पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे कारण देऊन हा मोर्चा रद्द करण्यात आला. सचिन खेमा याच्याविरोधात मोक्का अंतर्गत झालेली कारवाई आगामी मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जोरदार धक्का मानला जात आहे.