मुंबई । नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या सत्तास्थापनेतील कुरघोड्यामध्ये एक घटना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागली ती म्हणजे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होणं. एका मुलाखतीत फडणवीस यांनी त्याविषयीची सल व्यक्त केली. ‘मी मुख्यमंत्री होईन असं कुणालाही वाटलं नव्हतं तेव्हा मी मुख्यमंत्री झालो आणि माझ्यासहीत सर्वांना खात्री होती की मी पुन्हा मुख्यमंत्री होणार तेव्हा झालो नाही. हे सगळं अविश्वसनीय होतं. दोन दिवस माझा विश्वासच बसला नाही,’ अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय विश्लेषक व निवेदक राजू परुळेकर यांनी घेतलेल्या ‘द इनसायडर’ या ऑनलाइन मुलाखतीत दिली.
राजू परुळेकर यांनी अपेक्षित नसताना मुख्यमंत्री होणं आणि अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपद जाणं हा अनुभव कसा होता या प्रश्नावर फडणवीस यांनी मनमोकळे उत्तर दिले. ते म्हणाले, ‘मानसिकदृष्ट्या मी काही योग्याच्या पातळीवर पोहोचलेलो नाही. मी माणूसच आहे. त्यामुळं साहजिकच या घटना-घडामोडींचा आनंद व दु:ख हे मला झालं. सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्री होणार याचे संकेत केंद्रीय नेतृत्वानं मला वेगवेगळ्या मार्गांनी दिले होते. मात्र, मी ते कुणालाही कळू दिलं नव्हतं. अगदी आई आणि पत्नीलाही. त्यामुळं तशी घोषणा झाली तेव्हा मला अत्यानंद वगैरे झाला नाही. कारण त्याची मला आधीच कल्पना आली होती,’ असं ते म्हणाले.
”दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद न मिळणं हे माझ्यासाठी अविश्वसनीय होतं. त्याचं दु:ख निश्चितच झालं होतं. आमचं सरकार येत नाही हे समजल्यावर विश्वास बसायलाच दोन दिवस लागले. असं होऊ कसं शकतं, हेच समजत होतं. सर्वात जास्त आमदार भाजपचे निवडून आले होते. युतीचं बहुमत होतं. सगळं काही ठीक दिसत होतं. त्यानंतर दहा-पंधरा दिवसात मी नॉर्मल झालो. परिस्थिती स्वीकारली. त्यानंतर जी भूमिका मिळाली, ती घेऊन कामाला लागलो,” असं फडणवीस म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”