हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महापालिकेवर आयुक्त इक्बाल चहल हे मार्च 2022 पासून प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीचे तब्बल 94 माजी नगरसेवक आक्रमक झाले आहेत. संबंधित माजी नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले असून चहल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
माजी नगरसेवकांनी दिलेल्या तक्रारीच्या पत्रात म्हंटले आहे की, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या कार्यकाळात सुरू असलेल्या कामांमुळे आणि निर्णयांमुळे मुंबई महापालिकेचा दर्जा खालावत आहे. मुंबई महापालिकेमध्ये पारदर्शकता व उत्तरादायित्व यांचा अभाव दिसून येत आहे. मुंबई महापालिका प्रशासनाकडून हजारो कोटी रुपयांची कंत्राटे आणि प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. मात्र, त्याच्या संदर्भात कुठलाही सार्वजनिक मसुदापत्र सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. कामकाजाची पडताळणी किंवा नियंत्रण यावरील उपाय योजनांचा सुद्धा अभाव निर्माण झाला आहे.
मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या निकषांचे पूर्णपणे उल्लंघन केले जात आहे. या बदल्या मनमानी पद्धतीने केल्या जात आहेत. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पंधरवड्याला बदल्या केल्याचे आरोप माजी नगरसेवकांनी केला आहे. मुंबई महापालिकेमध्ये ‘कॅश फॉर ट्रान्सफर’ स्वरूपाचा मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
यामध्ये आळीपाळीने सर्वाधिक बोली लावणाऱ्यांना पदे दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या कारभारात आर्थिक गैरव्यवस्थापन त्यासोबतच वित्तीय बेशिस्तपणा दिसत आहे. सध्याच्या कारभारामुळे अधिकाऱ्यांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण होत असून महापालिकेचा कारभार घसरला असून दर्जा खालावत आहे, अशी तक्रार पत्रातून माजी नगरसेवकांनी केली आहे.