धुळे । भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह्य टीकेनंतर उठलेले राजकीय वादळ अजूनही शमलेले नाही. माजी आमदार अनिल गोटे यांनी आता भाजपवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. ‘धनगर समाजातील काही तरुणांना हाताशी धरून आणि शरद पवारांच्या जातीचा उल्लेख करून धनगर समाजाला मराठा समाजाविरोधात भडकविण्याचा भाजपचा छुपा अजेंडा आहे. हा छुपा अजेंडा राबवण्याचे काम शाखा-शाखांमधून कुजबुज आंदोलनाद्वारे सुरू आहे,’ असा घणाघाती आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.
माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रक काढून पडळकर व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला होता. भाजपनंही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या टीकेचा प्रतिवाद केला. त्यानंतर गोटे यांनी पुन्हा एकदा पत्रक काढून भाजप जाती-जातींमध्ये भांडणं लावत असल्याचा आरोप केला आहे. ‘नरेंद्र मोदी व अमित शहा जोडीनं कोरोनाचा आधार घेऊन हिंदू-मुस्लिम समाजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला. त्या आधारे हिंदू मतांच्या गाठोड्याची बांधाबांध सुरू केली आहे. तर, राज्यातील भाजप नेते पडळकरांच्या नथीतून मराठा समाजावर तीर चालवत आहेत. धनगरांना चिथावणी देत आहेत,’ असा आरोप गोटे यांनी केला आहे.
भाजपचा धनगर समाजातील नवा चेहरा असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. पवारांनी छोट्या समूहांना राजकारणासाठी वापरून घेतले. पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेले करोना आहेत, असं पडळकर म्हणाले होते. पडळकरांच्या या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News