माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह चौधरींचे कोरोनामुळे निधन, PM मोदींनी व्यक्त केले दुःख

ajit singh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोनामुळे देशात हाहाकार माजला आहे. अशातच कोरोनामुळे देशातील अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटींना देखील आपला जीव गमवावा लागला आहे. राष्ट्रीय लोकदलाचे (Rld )अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह चौधरी यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना कोरोना झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती जास्त खालावली. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये कोरोनाचा प्रचंड संसर्ग झाला होता. परिणामी त्यांची प्रकृती नाजूक झाली होती.

अजित सिंह चौधरी हे देशाचे माजी पंतप्रधान चरण सिंह चौधरी यांचे पुत्र होते. उत्तर प्रदेशच्या बागपत मतदारसंघातून ते सात वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री पदाची जबाबदारी देखील सांभाळली होती. अजित चौधरी हे उत्तर प्रदेशातील प्रमुख जाट नेत्यांपैकी एक होते त्यांच्या निधनाबद्दल आणि पश्चिम उत्तर प्रदेश मधील राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील अजित सिंह यांच्या निधनामुळे दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. केंद्रातील अनेक विभागाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सक्षमपणे पार पाडल्या. ‘ अशा आशयाचे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करत म्हटले आहे की , ‘अजित सिंह चौधरी यांच्या निधनाच्या बातमीने दुःख झाले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी नेहमीच आवाज उठवला. लोकप्रतिनिधी आणि मंत्र्याच्या रूपात त्यांनी नेहमीच देशाच्या राजकारणात आपली वेगळी छाप सोडली. त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सामील आहोत. अशी प्रतिक्रिया राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली आहे.