सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सोनगांव येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीमुळे गेल्या महिनाभरापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. 21 जागांपैकी तीन उमेदवार सौरभ शिंदे गटाच्या संस्थापक सहकार पॅनेलमधून बिनविरोध निवडून आल्यानंतर आज 18 जागांसाठी मतमोजणी करण्यात आली. यावेळी संस्थापक सहकार पॅनेलने पूर्ण बहुमत मिळवत 21-0 असा विजय मिळवला.
सोनगांव येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत उर्वरित 18 जागांसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यामध्ये संस्थापक सहकार पॅनेलचे प्रमुख सौरभ शिंदे विरोधात बचाव पॅनेलचे प्रमुख दीपक पवार यांच्या गटातील उमेदवारांच्या मतांची मतमोजणी करण्यात आली. यात संस्थापक सहकार पॅनेलचे प्रदीप तरडे, आनंदा सदाशिव मोहिते, अंकुश शिवणकर, ऍड. शिवाजी मर्ढेकर, शांताराम पवार, प्रदीप शिंदे या उमेदवारांचा विजय झाला.
कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी या ठिकाणी संस्थापक सहकार पॅनेलचे प्रमुख सौरभ शिंदे व विरोधात बचाव पॅनेलचे प्रमुख दीपक पवार यांच्या गटात सरळसरळ लढत पार पडली. यावेळी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीतील मतमोजणीनंतर विजयी घोषित केलेल्या उमेदवार व पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.