सातारा | केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत सातारा जिल्ह्याने चाैघांनी यश मिळविले आहे. सनपाने (ता. जावली) येथील ओमकार मधुकर पवार, कराड येथील रणजित यादव, सातार्यातील गोळीबार मैदान येथील ओमकार शिंदे, माण तालुक्यातील अमित शिंदे यांनी यूपीएससी परीक्षेत यशाचा झेंडा फडकावला आहे. या चाैघांच्या यशामुळे सातारा जिल्ह्याच्या लौकिकात भर पडली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने नागरी सेवेसाठी 17 मार्च 2021 रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखती 5 एप्रिल ते 26 मे या कालावधीत झाल्या. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. एकाचवेळी चाैघांनी मिळवलेल्या यशामुळे सातारा जिल्ह्यातील स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उर्जा देणारा हा निकाल म्हणावा लागेल.
जावली तालुक्यातील सनपाने गावातील ओमकार मधुकर पवारने या परीक्षेत पूर्ण देशामध्ये 194 वी रँक मिळवली आहे. या यशामुळे ओमकारचे आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. कराड येथील रणजित मोहन यादव यांने देशात 315वी रँक मिळवत यूपीएससी यश मिळविले. सातार्यातील गोळीबार मैदान येथील ओमकार राजेंद्र शिंदे यांने यूपीएससी परीक्षेत देशात 433 वी रँक मिळवली आहे. माणसारख्या दुष्काळी तालुक्यातील भांडवली, तेलदरा येथील अमित लक्ष्मण शिंदे यांनीही यूपीएससी परीक्षेत 570 वी रँक मिळवली आहे.