बीड | रूढी-परंपरांना मूठमाती देत चार मुलींनी जन्मदात्या आईच्या अर्थीला खांदा दिला. एव्हढच नाही तर पाचव्या मुलीने मुखाग्नी देत सर्व विधी पार पाडले. विशेष म्हणजे कोरोनाचे नियम पाळून मोजक्या लोकात हा अंत्यविधी पार पाडण्यात आला.
बीड जिल्ह्यातील शिरुर कासार जवळील जांब येथील रहिवासी लक्ष्मीबाई रामभाऊ कांबळे या माऊलीचे वृध्दापकाळाने काल पहाटे निधन झाले.त्यात लक्ष्मीबाई यांना मुलगा नसल्याने खांदा कोण देणार,मुखाग्नी कोण देणार अशी चर्चा सुरू झाली. अस असताना लहान मुलगी समोर आली आणि मी मुखाग्नी देते म्हणून म्हणाली तर चारी मुलींनी खांदा देण्याचं ठरवल, त्यात कोरोनामुळे कमी नातेवाईक हजर असल्याने सर्वांनी ते मान्य केल. लक्ष्मीबाई यांच्या 4 मुली सुनिता केदार, विमलबाई केदार, शशिकला केदार आणि भीमाबाई मोरे या मुलीनी खांदा दिला.तर कचराबाई खंडागळे या मुलीने सर्व उर्वरित तयारी केली. अंतयात्रा निघताना पाणि ताट घेऊन स्मशानाकडे शंकुतला सुतार या लहान मुलीने मार्गक्रमण करत नेले. त्याठिकाणी गावातील मंडळी, नातेवाईक यांच्यासमोर लक्ष्मीबाई यांच्या प्रेतास अग्नी दिला. या घटनेमुळे गावात व आसपासच्या परिसरात महिलांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. संपत्ती, पैसा, घर, शेती यांचा उत्तराधिकारी पुरुष अशी असा समज मोडीत काढत या पाच बहिणीनी आज नवा आदर्श निर्माण केला आहे.
मुलगा नसेल तर मोक्ष प्राप्त होत नाही, पाणी कोण पाजनार? स्वर्गाच द्वार उघडणार का ? मुलाने मुखाग्नी दिला तरच उद्धार होतो. असा समज गैरसमज आजही ग्रामीण भागात आहेत. याला छेद देत या पाच मुलींनी आईचा अंत्यसंस्कार केला आहे.परंपरेची बंधन झुगारून धाडस दाखवणाऱ्या या पाच बहिणीचे कौतुक होत आहे. तसेच मुला पेक्षा मुलगी देखील काही कमी नाही हे दाखवून देत. सर्व जबाबदाऱ्या बखुबीने पार पाडत मुली आपला ठसा उमटवत आहेत.