सोलापूर प्रतिनिधी । बिट काॅईन या आभासी चलनातून पंढरपुरातील काही प्रतिष्ठीत लोकांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पंढरपुरातील एका डाॅक्टर विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिट काॅईन चलनातून दाम दुप्पट रक्कम करुन देतो असे अमिष दाखवून संशियत आरोपी डाॅक्टर राहूल शेजाळ याने पंढरपूर शहरातील सुमारे २८ प्रतिष्ठीत लोकांची सुमारे २२ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करुन त्यांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी फसवणूक झालेले मधूकर देशपांडे यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात आज संशियत आरोपी डाॅक्टर राहूल शेजाळ याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
जून २०१८ पासून डाॅक्टर असलेल्या राहूल शेजाळ याने पंढरपूर, सांगोला, माळशिरस आदी भागातील प्रतिष्ठ लोकांशी सलगी करून बिट काॅईनच्या माध्यमातून दुप्पट रक्कम करुन देतो असे आमीष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणात आणखी काही लोकांची फसवणूक झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.