सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा शहर पोलीस ठाणेचे हददीमधील कोडोली, विदयानगर याठिकाणी दोन अनोळखी इसमांनी घरामधील महिलेस सोने- चांदी दागिण्याची पॉलिश करण्याच्या बहाण्याने फसवणूक केली. सदरील प्रकार काही वेळात महिलेच्या लक्षात आल्याने तिने पोलिस ठाणे गाठले. सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तात्काळ दखल घेत एकास अटक केली आहे. सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात अशाप्रकारे फसवणूक केल्याचे समोर आले असून पोलिस साथीदारांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका महिलेस संशयिताने पितळेची- चांदीची भांडी एका विशिष्ठ द्रव्याने पॉलिश करून दिली. त्यावरून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांचेकडून सोन्याच्या बांगडया पॉलिश करण्यास घेवून त्यादेखील एक विशिष्ठ द्रव्यामध्ये ठेवून त्या काही वेळानंतर बाहेर काढून एका कागदामध्ये गुंडाळून दिल्या व त्या थोडया वेळानंतर कागदातून बाहेर काढण्यास सांगून तेथून दोन अनोळखी इसमांनी पळ काढला. सदर महिलेस शंका आल्याने त्यांनी लगेच कागदात गुंडाळून दिलेल्या बांगडया पाहिल्या तेंव्हा त्याचेवर लाल रंगाचे आवरण दिसून आले. आपली काहीतरी फसवणूक झाली असल्याची शंका त्यांना आल्याने त्यांनी सोनाराकडे जावून सदर बांगडयांची तपासणी केली असता त्यातील सोन्याचे वजनात घट आल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाणेत सदर झालेल्या फसवणूकीबाबत तक्रार दिली आहे.
सदर फिर्यादीवरून सदरचा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने व सातारा जिल्हामध्ये अशा प्रकारे घटना वारंवार होत असल्याने सदर फसवणूक करणारे आरोपींना शोध घेवून अटक करण्याबाबत पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजित बो-हाडे, सहा पोलीस अधिक्षक आंचल दलाल मॅडम यांनी सातारा शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत सूचना दिल्याने सातारा शहर पोलीस ठाणेचे डी. बी. पथकातील पो. उपनिरीक्षक समीर कदम यांना मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे डी. बी. पथक सदर संशयितांनी तांत्रिक तसेच गोपनीय माहिती घेत होते.
त्याआधारे अशा प्रकारची फसवणूक करणारा परप्रांतिय युवक हा सातारा शहर परिसरामध्ये आल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने त्यास डी. बी. पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचकडे सदर गुन्हयाबाबत चौकशी करीत असताना तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. परंतू त्यांचेकडे अधिक कौशल्यपूर्ण तपास केला असता. त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
तसेच त्याचेजवळ सदरची फसवणूक करण्यासाठी आवश्यक असणारे केमीकलयुक्त साहित्य मिळून आले आहे. तसेच त्याने त्याचे अन्य साथीदारासोबत सातारा, सांगली, सोलापूर अशा जिल्हामध्ये अशाचे प्रकारे गुन्हे केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचे अन्य साथीदारांचा शोध सुरू असून सदर गुन्हयाचा तपास पो. हवा. अरूण दगडे व डी. बी. पथक करित आहेत. सदरची कारवाई गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, पो. कॉ, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, गणेश भोंग यांनी केलेली आहे.