सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
मिरज तालुक्यातील धामणी, बामणी परिसरात बलाढ्य गवा आज दाखल झाला आहे. सकाळी सहाच्या सुमारास बामणीतील माळभाग परिसरात ऊस तोडणी मजुरांना हा गवा दिसून आला. त्यानंतर तत्काळ वनविभागाचे पथक घटनास्थळी धावले. पायांच्या ठशांवरून तो गवा असल्याचे समोर आले असून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या महिन्यात शहरातील मार्केट यार्ड परिसरात गवा दाखल झाला. तब्बल २४ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर तो गवा पडकण्यात आला. त्यानंतर त्याला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आला.
शहरात मध्यभागात गवा आल्याने वनविभागाची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर आज सकाळी धामणी-बामणी परिसरात गवा असल्याचे निदर्शनास आले. सकाळी ऊस तोड मजुरांना तो बामणी भागातील माळ भाग परिसरात दिसून आला. त्यानंतर तातडीने गावच्या सरपंचाना ही माहिती देण्यात आली. बलाढ्य गव्याचा फोटोसेशन करण्यासाठी अनेकजण त्याठिकाणी आले, साऱ्यांना हुल देवून गवा ऊसात दडून बसला. दरम्यान, वनविभागाचे उपवनसंरक्षक विजय माने, मानद वन्य जीव रक्षक अजितकुमार पाटील यांच्यासह पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात शोध मोहिम राबविण्यात आली.
पाहणी केली असता त्याठिकाणी काही पायांचे ठसे दिसून आले. त्यावरून तो गवा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. मध्यमवयीन असणारा हा गवा सद्यातरी ऊसाच्या शेतात दडून बसला आहे. त्याला रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाची टीम तळ ठोकून आहे. परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गवा दिसून आल्यास त्याला हुस्कावण्याचा प्रयत्न करू नये, तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन मानद वन्य जीव रक्षक अजितकुमार पाटील यांनी केले आहे.