हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी दिवाळीपर्यंत गरिबांना मोफत धान्य देणार असल्याची मोठी घोषणा केलीय. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळीपर्यंत वाढविण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनाच्या संकटात काहीसा दिलासा मिळालाय.
देशातील गरीब नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली मोफत धान्य वाटपाची योजना यापुढील काळातही सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातील गरीब नागरिकांना मोफत धान्य वाटप दिवाळीपर्यंत म्हणजेच नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत नागरिकांना मोफत धान्य उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. याचा देशातील ८० कोटी नागरिकांना फायदा होणार असल्याचं मोदींनी सांगितलं.
करोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीबांच्या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने मार्च २०२० मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून दर महिन्याला दरडोई पाच किलो गहू अथवा तांदूळ मोफत देण्यात येत आहे या योजनेतल्या जवळपास ८० कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा राबवल्यानं गरीब आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.