राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी उमेदवार निश्चित? एकनाथ खडसे, आनंद शिंदे, राजू शेट्टी, अनिल गोटेंना संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांसाठी अखेर नावे निश्चित करण्यात आली आहेत. विधान परिषदेच्या एकूण १२ जागांपैकी शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस या प्रत्येकी पक्षाला ४ जागा येणार आहेत. राष्ट्रवादीच्या कोट्यातील ४ जागांवर कोणाला संधी दिली जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यापैकी एका जागेवर भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसे यांना संधी मिळेल. तर उर्वरित ३ जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि अनिल गोटे यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर काँग्रेसची नावे दोन दिवसात जाहीर होणार आहेत. (NCP finalized list of MLC members)

विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आनंद शिंदे आणि राजू शेट्टी यांच्या नावाची अगोदरपासूनच चर्चा होती. त्यानुसार राष्ट्रवादी कडून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राजू शेट्टी, आणि आनंद शिंदे यांच्या नावाची शिफारस केली जाईल. भाजप नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित असून त्यांना विधानपरिषदेचे तिकीट दिलं जाणार आहे. तर चौथ्या जागेसाठी उत्तमराव जाणकार आणि अनिल गोटे यांच्यात चुरस आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या गोटे यांना संधी दिली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणं आहे.

राज्यपालनियुक्त सदस्यासाठी काय असतात निकष?
कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे. राजकीयदृष्ट्या सोय पाहता अनेकदा हे निकष बाजूला ठेवले जातात. मात्र, कधी कधी राज्यपाल हे निकष पूर्ण करण्याचा आग्रह धरतात. अशा वेळी राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष होऊ शकतो.

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीवेळी महाविकासआघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात संघर्ष झालेला पाहायला मिळाला होता. सध्याच्या १२ जागाही जून महिन्यात भरल्या जाणे अपेक्षित होते. मात्र, राज्यपालांनी कोरोना परिस्थितीचे कारण देत या नियुक्त्या पुढे ढकलल्या होत्या. परंतु, यावेळी महाविकासआघाडीने १२ जागा भरायच्याच, असा चंग बांधला आहे. त्यामुळे राज्यपालांनी त्याला नकार दिल्यास पुन्हा एकदा संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment