‘दलित अत्याचारांविरुद्ध नेहमी मूग गिळून बसणाऱ्या राऊतांनी आम्हाला शिकवू नये’; आठवलेंची टीका

मुंबई । दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या खासदार संजय राऊतांनी आम्हाला दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याचं शिकवू नये असा जोरदार टोला रिपाई अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी लगावला आहे. संजय राऊत यांनी आजपर्यंत कधीही दलित अत्याचाराविरुद्ध ब्र शब्द काढला नाही. दलित अत्याचारविरुद्ध कधी ते पुढे आले नाहीत. दलित अत्याचार जिथे होईल तेथे मी पोहोचलेलो आहे. दलित अत्याचाराविरुद्ध सतत लढत राहिलो आहे. दलित पँथरच्या चळवळीतून मी पुढे आलो आहे असं म्हणता आठवले यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले.

रामदास आठवले म्हणाले की, संजय राऊत यांनी संसदेत खासदार म्हणून ही दलित अत्याचार प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला नाही. दलितांच्या प्रश्नांवर दलित लढत असतात पण दलितांच्या प्रश्नांसाठी सवर्ण पुढाऱ्यांनी कधी लढा उभारला आहे का? दलितांचे मतदान हवे आहे पण दलितांवरील अत्याचाराचा साधा निषेध तरी यापूर्वी कधी संजय राऊत आणि त्यांच्या पक्षनेत्यांनी केला आहे का? असा सवाल रामदास आठवले यांनी केला आहे.

संजय राऊत हे नटींच्या घोळक्यात असतात की नाही ते माहीत नाही. मी नटींच्या घोळक्यात नसतो, मी मात्र नेहमी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असतो. हाथरसची घटना घडली त्यादिवशी मुंबईत राज्यपालांची पूर्वनियोजित भेट ठरली होती. ती भेट झाल्यानंतर आम्हाला हाथरसच्या घटनेची माहिती मिळाताच त्या अमानुष घटनेचा आम्ही तीव्र निषेध केला. आंदोलन केले. लखनऊला जाऊन उत्तर प्रदेशच्या राज्यपालांना भेटलो. हाथरसला भेट देण्यास जाताना तेथील जिल्हा प्रशासनाने सर्वच पक्षाच्या नेत्यांना भेट देण्यापासून रोखले होते. त्यामुळे मी 2 ऑक्टोबरला हाथरस जाऊ शकलो नाही आता मात्र उद्याच हाथरसला जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे. त्यांना संरक्षण मिळवून देणार अहे असा खुलासा आठवले यांनी केला.

तसेच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जे कलावंतांची कदर करणारे नेते होते. त्यांचे अनेक चित्रपट कलाकारांशी चांगले संबंध होते. त्यामुळे एखाद्या अभिनेत्री महिलेवर अतिप्रसंगचा एवढा अन्याय झाला असताना त्या महिलेची बाजू संजय राऊत यांनी घेतली नाही. कलाकार अभिनेत्री यांना महिला म्हणून सन्मान न देता त्यांना जाहीर अपशब्द वापरले आहेत. त्यातून कलाकारांचा सन्मान करण्याची बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती त्या भूमिकेला हरताळ फासण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहे. कंगना राणौत प्रकरणात आम्ही कधीही संजय राऊत यांच्यावर टीका केली नाही ते आमच्यावर टीका करीत असले तरी त्यातून मी त्यांच्यावर नाराज नाही. ते माझे मित्र आहेत.

पायल घोष ही अभिनेत्री महिला तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत भूमिका मांडते. ती अभिनेत्री असली तरी महिला आहे त्यातून आम्ही तिची बाजू घेतली संजय राऊत यांनी तिची बाजू घेतली का? जिथे जिथे महिलांवर दलितांवर अत्याचार होतात तिथे तिथे आम्ही त्या त्या महिलेची बाजू घेत आलो आहोत. दलितांच्या प्रश्नांवर आम्ही सतत लढत आलो आहोत पण संजय राऊत हे कधी सामनामधूनही दलित अत्याचाराच्या प्रश्नावर व्यक्त झाले नाहीत असा आरोप रामदास आठवलेंनी केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com