टीम, HELLO महाराष्ट्र। सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे काम जलदगतीने सुरु आहे. काही ठिकाणचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम सुरु असताना चोरटयांनी या मेट्रोच्या साहित्यावरच डल्ला मारायला सुरवात केली आहे. पिंपरी ते दापोडी दरम्यान महामेट्रोचे काम सुरू असताना चोरट्यांनी वल्लभनगर, पिंपरी येथून 65 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले असल्याची बाब उघडकीस आली आहे.
सामान चोरी झाल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ नागनाथ गायकवाड (वय 38, रा. क्रांतीवीर नगर, थेरगाव) यांनी मंगळवारी (दि. 10) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनवायर इंजिनिअरिंग इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीकरिता फिर्यादी गायकवाड हे सुरक्षा रक्षकाचे काम करतात. 11 नोव्हेंबर रोजी पहाटे तीन ते सकाळी आठ वाजताच्या दरम्यान वल्लभनगर येथे सुरू महामेट्रोच्या कामाच्या साइटवरून अज्ञात चोरट्यांनी 25 हजार रुपये किंमतीच्या 25 स्टील स्ट्रक्चरच्या प्लेटस्, 40 हजार रुपये किंमतीचे 40 लोखंडी चैनल असा एकूण 65 हजार रुपये किंमतीचा माल चोरून नेला. याबाबत गायकवाड यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. या अर्जावरून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सतेश जाधव याबाबत अधिक तपास करीत आहेत.