हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर नविन संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह खासदारांनी प्रवेश केला आहे. आता थोड्याच वेळात नविन संसदेत विशेष अधिवेशनाच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. सर्व खासदार नविन संसद भवनात आसनस्थ झाले आहेत. जुन्या संसद भवनाला निरोप दिल्यामुळे आजचा दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. मुख्य म्हणजे, जुनी संसद इतिहास जमा होऊ नये म्हणून जुने संसद भवन संविधान भवन म्हणून ओळखले जावे अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
जुने संसद भवन इतिहास जमा
जुन्या संसद भवनाचे उद्घाटन 18 जानेवारी 1927 रोजी करण्यात आले होते. तर ब्रिटिश वास्तुविशारद सर एडविन ल्युटेन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी जुन्या संसद भवनाची रचना केली होती. त्याकाळी जुने संसद बांधण्यासाठी 83 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. जुन्या संसद भवनात आजवर अनेक महत्त्वाची कामकाजे पार पडली आहेत. जुन्या संसदेला उभारण्यासाठी तब्बल अडीच हजार कामगारांनी सहा वर्षे घाम गाळून एकूण 566 मीटर व्यासामध्ये 27 फूट उंचीच्या 144 खांबावर उभी असलेली गोलाकार इमारत तयार केली होती. आज हीच इमारत इतिहास जमा झाली आहे. आज पासून नव्या संसद भवनात काम सुरू करण्यात आले आहे. परंतु जुनी संसद कायम स्मरणात राहावी यासाठी तिला संविधान भवन म्हणून अशी ओळख देण्यात आली आहे.
नविन संसद भवन
थोड्यावेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बाकी खासदारांनी नवीन संसद भवनात प्रवेश केला आहे. आता नवीन संसद भवनात विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज देखील सुरू करण्यात आले आहे. परंतु त्यापूर्वी जुन्या संसदेविषयी भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, “माझी सर्वांना विनंती आहे की, आपण आता नवीन संसद इमारतीत जाणार आहोत, मात्र याचवेळी जुन्या संसद भवनाची प्रतिष्ठाही कमी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तसेच नुसते त्याला जुने संसद भवन असे म्हणणे सोडून द्यायला हवे. आपण सर्व सहमत असाल तर, भविष्यात जुन्या संसद भवनाला संविधान भवन म्हणून ओळखले जावे.