जिल्ह्यातील बाराशे कोटी रुपयांची थकीत असून त्यामध्ये सांगलीतील २८१ कोटी रुपयांचा समावेश आहे. साखर आयुक्तांनी थकित एफआरपी आणि त्याच्यावर १५ टक्के व्याजाची रक्कम तातडीने देण्याचे सूचना दिल्या आहेत. मात्र कारखानदार एफआरपी देण्याच्या तयारीत नसल्याचे दिसते. त्यामुळे १ जूनपर्यंत थकीत एफआरपीची व्याजासह रक्कम न मिळाल्यास ५ जूनपासून साखर आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बळीराजा संघटनेचे बी. जी. पाटील, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे आणि जय शिवराय किसान मोर्चाचे शिवाजी माने यांनी दिला.
जिल्ह्यातील थकित एफआरपीबाबत साखर कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन तिन्ही संघटनांच्या वतीने संयुक्तपणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने पहिल्या दीड ते पावणेदोन महिन्यांची बिले दिली आहेत. जानेवारीपासून १००% एफआरपी दिलेली नाही, तसेच काही कारखाने ८० टक्के पेक्षाही कमी रक्कम दिली आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे २८१ कोटी रुपयांची थकीत एफआरपी आहे. जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांना उसाची बिले ठकविल्या कारणावरून साखर आयुक्तांनी आरआरसीची कारवाई केली होती. सर्व कारखान्यांनी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली. मात्र १५ टक्के व्याजाची रक्कम अद्यापही दिले नाही. कारखान्यांनी एफआरपी दिली, म्हणून तहसीलदारांनी आरआरसीची कारवाई थांबवली आहे.साखर कारखान्यांनी प्रत्यक्षात बिले दिलेली नाहीत.
याबाबत तिन्ही संघटनांच्यावतीने आम्ही साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली आहे. त्यांनी एफआरपीवरील 15 टक्के व्याजाची रक्कम वसुली करण्याचे आदेश दिले आहेत एफआरपी आणि व्याजासह रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देऊनही कारखान्यांनी अद्याप दिलेली नाही. त्यासाठी कारखान्यांना नोटीस देऊन साखर जप्तीची कारवाई करण्याची गरज होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप बळीराजा संघटनेचे पाटील यांनी केला.
साखर आयुक्तांनी साखर कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश देऊनही तहसीलदार त्याची अंमलबजावणी करत नसतील तर संबंधित तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना थकीत एफआरपी देण्यासाठी १ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत एफआरपी न दिल्यास साखर आयुक्त कार्यालयात ५ जूनपासून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बळीराजा संघटनेचे पाटील यांनी दिला.