सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वाढे गावात कांताताई नलवडे यांच्या बंगल्याच्या पाठिमागे एक अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह आढळुन आला होता. त्या अनुशंगाने सातारा तालुका पोलीस ठाणे गुन्हा दाखल करणेत आला होता. सदर गुन्ह्याचे तपासामध्ये अनोळखी मृतदेहाची प्रथम ओळख पटवुन तिचे नाव मंगल शिवाजी शिंदे (वय- 50 वर्षे, रा. संगम माहुली ता.जि. सातारा) असे असल्याचे निष्पन्न झाले होते.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मोहन शिंदे सातारा यांनी सदर खुनाच्या गुन्हयात निष्पन्न आरोपी यास अटक करणेबाबत सुचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांचे अधिपत्याखाली सातारा तालुका पोलीस ठाणेस विशेष वेगवेगळी पथके तयार केली होती. त्यानुसार वेगवेगळी पथके वेगवेगळ्या शहरांमध्ये रवाना झालेली होती. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वेगवेगळे बातमीदार पुणे, मुंबई अशा शहरामध्ये सतर्क केले होते. परंतु सदरचा आरोपी चकवा देत असलेने तो मोबाईल वापरत नसल्याने व कोणाचेही संपर्कात येत नसलेने अथक परिश्रम करुनही पोलीसांना त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता.
अखेर दि. 23 जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सातारा तालुका पोलीस ठाणे यांना बातमी प्राप्त झाली की आरोपी हा पुण्यामध्ये लपून बसलेला आहे. त्यावेळी तात्काळ एक पथक पुणे येथे पाठवून कौशल्यपूर्वक तपास करुन सापळा रचून आरोपीस पुण्यातून ताब्यात घेवून अटक केले आहे. पोलीस उपनिरीक्षक श्री. दळवी, पो. ना. संदिप आवळे, निलेश जाधव, मालोजी चव्हाण, नितीराज थोरात, राहुल राऊत, सचिन पिसाळ व चालक गिरीष रेड्डी यांनी सहभाग घेतला.