वचनपूर्ती : साखर मोफत घरपोच तर अंतिम 208 रुपयांचे बिल खात्यावर वर्ग

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची यंदाची दिवाळीही गोड होणार आहे. कारण कृष्णा कारखान्याने गेल्या हंगामातील ऊसबिलाचा 208 रुपयांचा अंतिम हफ्ता शेतकरी सभासदांच्या खात्यावर वर्ग केला आहे. तसेच सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने चेअरमन डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी निवडणुकीपूर्वी प्रत्येक सभासदास दिली जाणारी प्रतिशेअर 60 किलो मोफत साखर घरपोच देण्याचे अभिवचन दिले होते. या अभिवचनाची वचनपूर्ती करत कारखान्याने, विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर घरपोच मोफत साखर मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा 62 वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न झाला. चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते आणि श्री. विनायक भोसले, व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्यासह मान्यवर संचालकांच्या उपस्थितीत बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.

सुरेश भोसले म्हणाले, कृष्णा कारखान्याने आपली प्रतिदिन गाळप क्षमता 12 हजार मेट्रीक टन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गेल्या हंगामातील ऊसबिलाचा 208 रुपयांचा अंतिम हफ्ता शेतकरी सभासदांच्या खात्यावर वर्ग केला आहे. तसेच येत्या काळात तोडणी यंत्रणा अधिक सक्षम बनविण्यासाठी ऊसतोड करणाऱ्या ट्रॅक्टर्सना जीपीएस प्रणाली बसविण्यात येणार आहे. याशिवाय भविष्याचा वेध घेत, इथेनॉल उत्पादनात वाढ करण्याबरोबरच येत्या काळात सी.एन.जी. प्रकल्प उभारण्याचाही मानस आहे.

कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी प्रास्तविकपर भाषणात म्हणाले, कारखान्याकडे यंदा 15 हजार हेक्टर ऊसाची नोंद झालेली आहे. येणारा हंगाम हा 160 दिवसांहून अधिकचा असून, कारखान्याने 13 लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. साखरेचा सरासरी उतारा 12.75 टक्के राहिल याकडे प्रशासनाचा कटाक्ष असून, 15 ते 16 लाख क्विंटल साखरेचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. तसेच को-जनरेशन विभागातून 6 कोटी युनिट वीजनिर्मिती, तर 2 कोटी लिटरहून अधिक इथेनॉलचे उत्पादन घेण्याचा संकल्प आहे.

यावेळी संचालक लिंबाजीराव पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, सयाजी यादव, दत्तात्रय देसाई, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, दीपक पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, पं. स. सदस्य बाळासाहेब निकम, पैलवान आनंदराव मोहिते, एम. के. कापूरकर, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले, बाळासाहेब पाटील, सेक्रेटरी मुकेश पवार आदींसह सर्व अधिकारी, कर्मचारी व सभासद शेतकरी उपस्थित होते.

You might also like