माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 16 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर
कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
राज्याचा अर्थसंकल्प नुकताच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पातून जास्तीत जास्त निधीची तरतूद मतदारसंघातील गावासाठी व्हावी यासाठी माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न केले. त्याच्या प्रयत्नानंतर आता कराड दक्षिण मतदारसंघातील गावांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी काही महत्वाची कामे अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित यादीमधून सुमारे 16 कोटी 50 लाख इतक्या रक्कमेची कामे मंजूर झाली आहेत.
अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये कराड-ढेबेवाडी रस्ता प्रजिमा ५५ कि.मी. ७/२०० ते ८/२०० मधील रस्त्यासाठी उर्वरित लांबीतील क्षेत्राचे भूसंपादन करण्यासाठी ७ कोटी रुपये. डिचोली, नवजा, हेळवाक, मोरगिरी, साजूर, तांबवे, विंग हॉटेल, वाठार, रेठरे, शेणोली स्टेशन रा.मा. १४८ कि. मी. ८५/०० ते ८६/५०० रस्त्याची सुधारणेसाठी १ कोटी ५० लाख रुपये. आटके टप्पा ते आटके, जाधवमळा, रेठरे बु. व्हाया डंगरे वस्ती, पवारमळा, खुबी रस्ता प्रजिमा – ७७ कि.मी. ०/०० ते ६/०० (भाग-आटके टप्पा ते रेठरे बु.) रुंदीकरण व मजबुतीकरणासह सुधारणा करणे यासाठी ५ कोटी रुपये. कालेटेक, काले, संजयनगर, कालवडे, नांदगाव, साळशिरंबे, पाचुम्बरी रस्ता प्रजिमा ७३ कि.मी. ०/०० ते ५/०० (भाग-कालेटेक ते कालवडे) ची सुधारणेसाठी २ कोटी रुपये. कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर रस्त्यावर कि.मी. ४/६०० दरम्यान प्रजिमा ६९ पार्ले गावाजवळील पुलासाठी संरक्षणभिंतीचे बांधकाम करणे व पार्ले गावासाठी जोड रस्ता करण्यासाठी १ कोटी रुपये.
अशा एकूण १६ कोटी ५० लाख रुपयांच्या कामांना अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली असून या कामांमधून मंजूर गावातील कामे केली जाणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणचे लोकप्रतिनिधी असल्यापासून त्यांनी प्रत्येक गावामध्ये कोट्यवधी रुपयांची कामे आजपर्यंत केली आहेत. आता आणखी १६ कोटी ५० लाख रुपयांची कामे मंजूर झाल्याने मतदारसंघातील जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.