गडचिरोली प्रतिनिधी | गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक दारूमुक्त तर व्हावीच पण यंदा आम्हाला उमेदवारही दारूमुक्त म्हणजेच दारूबंदीचा समर्थक आणि दारू न पिणारा असावा अशी मागणी येथील मतदारांनी केली आहे. जिल्ह्यातील २७३ गावांच्या १२० ग्रामपंचायतींनी याबाबतचे प्रस्ताव ग्रामसभेत पारित केल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक आणि मुक्तिपथ अभियानाचे संस्थापक डॉ. अभय बांग यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत दिली.
गडचिरोली जिल्ह्यात २२ वर्षे दारूबंदी आहे. गेली तीन वर्ष याठिकाणी ‘मुक्तिपथ’ अभियान सुरू आहे. त्याअंतर्गत व्यापक कार्यक्रमातून गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत ६०० गावांनी सामूहिक निर्णयाने आपल्या गावातील दारू बंद करून ठेवली आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होणार आहे. निवडणूक काळात लोकांना दारूचे आमिष देऊन त्यांचे अमूल्य मत विकत घेण्याचा प्रकार बरेचदा पाहावयास मिळतो. गडचिरोली जिल्हाही त्याला अपवाद नाही. असे झाल्यास गावांनी परिश्रमाने टिकवून ठेवलेली दारूबंदी निकामी ठरते. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक दारूमुक्त होणे गरजेचे आहे असे डॉ. बंग यावेळी म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत उमेदवार कसा असावा याबद्दल २८७ गावांच्या १२० ग्रामपंचायतींनी ग्रामसभांमध्ये प्रस्ताव पारित करून राजकीय पक्षांना आवाहन केले आहे.
कसा असावा उमेदवार –
१. राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी उभा करायचा उमेदवार स्वतः दारू न पिणारा असावा व दारूबंदीचा समर्थक असावा.
२. उमेदवारांनी निवडणुकीच्या प्रचारात दारू वाटप करू नये.
३. मतदारांनी मतदान दारूच्या नशेत करू नये.
या तीन गोष्टींना सकारात्मक प्रतिसाद देत सर्व राजकीय पक्षांनी जनतेच्या मतांचा सन्मान करावा. उभा राहणारा उमेदवार दारू पिणारा, दारूचे समर्थन करणारा किंवा मतांसाठी दारूचा वापर करणारा असल्यास अशा उमेदवाराला जनता मत देणार नाही असेही या प्रस्तावात नमूद आहे. हे प्रस्ताव सर्व पक्षांच्या राज्य अध्यक्षांना पाठविण्यात आलं आहे. ‘या निवडणुकीत दारू पिण्यार्याला उमेदवारी देऊ नका’ तसेच दारू विक्रीचे समर्थन करणारा उमेदवार चालणार नाही, अशा आशयाचे बॅनरही गडचिरोली शहरात लावण्यात आले आहेत.