हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून निष्ठा यात्रा काढली जात आहे. या निष्ठा यात्रेवरून मनसेने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “छोटे नवाब यांनी काढलेल्या निष्ठा यात्रेचे उलट परिणाम दिसू लागलेत. त्यामुळे त्यांना आता शिल्लकयात्रा काढावी लागणार, असं दिसतंय,” असा टोला मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विटद्वारे आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जिल्हा, शहर आणि ग्रामीण भागातील शिवसेना पदाधिकारी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत बाहेर पडत आहेत. दरम्यान, शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्याकडून ठिकठिकाणी शिवसेनेचे मेळावे आयोजित केले जात आहे. तसेच निष्ठा यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. मात्र याचे उलट परिणाम दिसत असल्याचा आरोप गजानन काळे यांनी ट्विटद्वारे केला आहे.
छोटे नवाब यांच्या 'निष्ठा यात्रेचे'तर उलटे परिणाम दिसू लागलेत… आमदार, नगरसेवक यांनी साथ सोडल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते,जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी पण यांचा पक्ष सोडू लागले … आता यांना लवकरच 'शिल्लक यात्रा'काढावी लागणार असं दिसतंय … #शिल्लकसेना
— Gajanan Kale (@MeGajananKale) July 15, 2022
काळेंनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “छोटे नवाब यांच्या ‘निष्ठा यात्रेचे’तर उलटे परिणाम दिसू लागलेत. आमदार, नगरसेवक यांनी साथ सोडल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी पण यांचा पक्ष सोडू लागले आहेत. आता युवराजांना लवकरच ‘शिल्लक यात्रा’ काढावी लागणार असं दिसतंय,”