हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार स्थापन केले असले तरी काही नेत्यांमध्ये अंतर्गत नाराजी कायम आहे. याचाच प्रत्यय दापोली येथे आला. हे तर फक्त म्हणायला ठाकरे सरकार आहे, पण लाभ घेते पवार सरकार अस म्हणत शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी नाराजी व्यक्त केली. आघाडीत अंतर्गत भेद खूप आहेत आणि त्याचा त्रास होतो असे कीर्तीकर म्हणाले.
गजानन किर्तीकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे गावी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे दापोलीतील आमदार योगेश कदम उपस्थित होते. डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन झाल्यानंतर किर्तीकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीवर आपली नाराजी व्यक्त केली.
गजानन कीर्तिकर म्हणाले, एका आमदाराला त्याच्या मतदार संघात विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात. विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळ केली जात आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या २५ /१५ योजनेमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पहावयास मिळते. आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही. मुंबईमध्ये नागरोत्थान, नगरविकासचा निधी मिळतो. मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवितो. मात्र, निधीची पळवापळवी केली जात असून, आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेतो, पवार सरकार असे म्हणत त्यांनी निधी वाटपात शिवसेनेवर अन्याय होत असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.