गणपती बाप्पा मोरया!! पुण्यातील प्रतिष्ठित मंडळांच्या पुढाकाराने काश्मीरमध्ये साजरा झाला गणेशोत्सव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । विशाखा महाडिक
यंदा काश्मीरमध्येही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला गेला. काश्मीरमधील सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन केल्याने झाली. पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टसह प्रमुख मानाच्या गणपती मंडळांनी एकत्र येऊन काश्मीर येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पुढाकार घेतला होता. पुण्यासह जगभरात साजरा होत असलेला सार्वजनिक गणेशोत्सव काश्मीरमध्ये होत नाही. ही बाब लक्षात घेऊन हिंदुस्थानात प्रथम सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीसह कसबा गणपती,

तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा आणि अखिल मंडई या मंडळांनी गतवर्षी काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार या मंडळांनी ग्रामदेवता कसबा गणपतीची प्रतिकृती असलेली मूर्ती काश्मीरमधील ‘गणपतीयार ट्रस्ट’चे संदीप कौल आणि सिशांत चाको यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्यानुसार काश्मीरमध्ये गणेश चतुर्थीला प्रथमच सार्वजनिकरित्या बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती.

दीड दिवसाने झेलम नदीत बाप्पाचे विसर्जन करण्यात आल्याची माहिती ‘गणपतीयार ट्रस्ट’कडून देण्यात आली आहे. तसेच पुण्यातील या मंडळांचे त्यांनी आभारही मानले. याविषयी बोलताना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन म्हणाले, ‘काश्मीरमध्ये यंदा दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा झाला. या बाप्पाचे काल भावपूर्ण पद्धतीने विसर्जन करण्यात आले. या गणेशोत्सवामुळे काश्मीर भागात सुख, समृद्धी आणि शांतता नांदावी, अशी मी श्री गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो’.