नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महत्वाचे म्हणजे इगतपुरी तालुक्यात गुन्हेगारीने परिसिमाच गाठली आहे. या तालुक्यात दिवसाढवळ्या गँगवार पाहायला मिळत आहे. इगतपुरीत पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. या हाणामारीत एकाचा खून तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गॅंगवारमुळे इगतपुरीमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. यामुळे इगतपुरीतले नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. या घटनेची माहिती मिळताच राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेमुळे गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
विशेष म्हणजे एवढा मोठा गदारोळ होतो तोपर्यंत पोलीस कुठे असतात, पोलिसांना याबाबत कोनोकान खबरही लागत नाही? याशिवाय आरोपींना पोलिसांची अजिबात भीती वाटत नाही का? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत. या घटनेमुळे इगतपुरीच्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा अशाप्रकारच्या घटना तरी कशा घडू शकतात? असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. हे आरोपी गुंड इतक्या भयानक पद्धतीने एकमेकांना भिडतात त्यावेळी कुणी सर्वसामान्य तिथे आजूबाजूला असला तर त्याचाही जीव घ्यायला ते गुंड मागेपुढे बघणार नाहीत, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यादरम्यान संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना कोरोना संकट काळात आर्थिक संकटासह अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये या गुंडांच्या हैदोसाने त्यांच्यावर दुकानं बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांवर मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. या प्रकरणामुळे पोलीस आतातरी गंभीर दखल घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुरळीत करतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. इगतपुरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.