मुंबई प्रतिनिधी | समाजवादी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस वय 88 यांचे आज नवी दिल्लीत दीर्घ आजारानंतर निधन झाले. साथी जॉर्ज यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचा पाच दशकांचा आधारस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला आहे.
जॉर्ज नावाचे वादळ आज अखेर शांत झाले. गेली काही वर्षे ते अल्झायमर या आजाराने ग्रस्त होते. देशातील अनेक आंदोलनांचे नेतृत्व केलेले जॉर्ज हे एक वादळी व्यक्तिमत्व होते. रेल्वे कर्मचार्यांचा देशातील एकमेव संप त्यांनी घडवून आणला होता. एकेकाळी काँग्रेसचे दिग्गज नेते स. का.पाटील यांचा त्यांनी लोकसभा निवडणुकीत मुंबईमध्ये पराभव केला आणि त्यांच्या नावाची देशभर चर्चा झाली.
1974 मध्ये रेल्वे कर्मचार्यांच्या संपाचे नेतृत्व करणारे जॉर्ज फर्नांडिस पुढे जनता पक्षाच्या राजवटीत रेल्वेमंत्री झाले. समाजवादी नेते मधु दंडवते यांच्या सोबतीने त्यांनी कामगारांचे अनेक लढे उभे केले होते. खादीचे कपडे खांद्यावर एक झोळी आणि पायात साधी चप्पल ही जॉर्ज यांची आयुष्यभर ओळख राहिली.