औरंगाबाद – जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी सिल्लोड तालुक्यातील लसीकरण सर्वात कमी असल्याचे सांगत उपहासात्मक अभिनंदन करून येत्या आठ दिवसांत उर्वरित सव्वीस हजार नागरिकांचे लसीकरण करून घ्या, अन्यथा कारवाईला तयार रहा, असा सज्जड दम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी दिला आहे. तसेच लस न घेणाऱ्या नागरिकांचे रेशनसह किराणा सामान सुद्धा बंद करण्याचे आदेश त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहे. सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील लसीकरण, स्वच्छता, जलजीवन मिशन, आवास योजना, महावितरण वीजबिल व मातोश्री पाणंद रस्त्याबाबत आयोजित केलेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे यांनी सरपंच, ग्रामसेवक व आरोग्य विभागाचा सविस्तर आढावा घेतला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता शंभर टक्के लसीकरण व्हावे, यासाठी पंतप्रधानांना औरंगाबाद जिल्ह्याचा आढावा घ्यावा लागला. त्यामुळे आपण 54 टक्क्यांवरून 80 टक्क्यांपर्यंत पोहोचलो असून राज्यात 16 व्या क्रमांकावर आलो आहोत. पण शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी सर्वांनी वैयक्तिक नियोजन करून आठ दिवसात राहिलेले लसीकरण पूर्ण करावे. यात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. जे आरोग्य अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक व सरपंच निष्काळजीपणा करतील त्यांच्यावर नाइलाजाने मला कारवाई करावी लागेल असे गटणे म्हणाले. दरम्यान, सिल्लोडमध्ये सर्वात कमी झाल्याने त्यांनी येथे आठ दिवसांत सव्वीस हजार नागरिकांचे लसीकरण करून घेण्याचे आदेश दिले. तसेच लस न घेणाऱ्या नागरिकांचे रेशनसह किराणा सामान सुद्धा बंद करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता येत्या आठ दिवसांत तालुक्यात किती लसीकरण होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एका डॉक्टरने बोगस प्रमाणपत्र दिल्यामुळे जिल्ह्याला गालबोट लागले आहे. तेव्हा कुणीही बोगस प्रमाणपत्र देऊ नका, कौतुकासाठी किंवा वेळ मारुन नेण्यासाठी चुकीची कामे करू नका. लस घेण्यासाठी लोकांना तयार करा, ‘हर घर दस्तक’ही मोहीम राबवून लस घेतल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते, लस घेतल्यामुळे देशात एकही मृत्यू झालेला नाही हे समजावून सांगा अशा सूचना तालुक्यातील सर्व विभागप्रमुख, सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचाऱ्यांना गटणे यांनी केल्या.