हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्यांनतर आता शिवसेना भवन, शाखा आणि पक्षाचा निधी शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात यावा अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. एका वकिलाने थेट ही याचिका दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
अॅड. आशिष गिरी असे या वकिलांचे नाव असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा आणि पक्षाचा निधी देण्यात यावा अशाप्रकारची याचिका त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. तसेच या याचिकेवर येत्या 24 तारखेला सुनावणी करण्याची विनंतीही त्यांनी कोर्टाला केली आहे. शिवसेना पक्ष नक्की कोणाचा आहे यावर निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नावे बँक खातं केवळ शिवसेनेचं असेल, तर त्याचे सर्व अधिकार शिंदे गटाला जातात. त्यामुळे पक्षाचा हा सर्व निधी शिंदेच्या शिवसेनेला देण्यात यावा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे
खरं तर जेव्हा निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे त्यांच्या गटाला दिल्यानंतर आपण शिवसेना भवन आणि पक्षाच्या निधींवर दावा करणार नाही अशी भूमिका शिंदे गटाने घेतली होती मात्र आता अचानक कोर्टात याबाबतची याचिका दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सदर वकील अॅड. आशिष गिरी हे शिंदे गटाशी संबंधित आहेत कि नाहीत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु त्यांच्या या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेतल्यास उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जाईल.