सातारा | राज्याचे माजी दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या पळसावडे (ता. माण) येथील घरी चोरी झाल्याचे समोर आले आहे. याबाबतची फिर्याद महादेव जानकर यांचे बंधू सतीश जानकर यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात दिली आहे. यामुळे आता माण तालुक्यात सर्वत्र मंत्र्याच्याच घरी चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पळसावडे येथील माजी मंत्री महादेव जानकर यांचे वडिलोपार्जित घर आहे. या घरामध्ये माजी मंत्री जानकर यांचे दोन बंधू राहण्यास आहेत. घराशेजारी असलेली शेती ते करत असून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी घरीच शेळीपालन केले आहे. शुक्रवार दि. 5 ऑगस्ट रोजी शेळ्यांना चारा टाकून सतीश जानकर झोपी गेले.
त्यानंतर शनिवारी दि. 6 रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी सतीश जानकर गोठ्यात गेले होते. तेव्हा, त्यांनी शेळ्यांच्या गोठ्याकडे जावून पाहिले असता, त्यांना काही शेळ्या दिसून आल्या नाहीत. या गोठ्यातून 4 शेळ्या गेल्या आहेत. सतीश यांनी सर्वत्र शोध घेवून म्हसवड पोलिस ठाण्यात सुमारे 30 हजार रुपये किंमतीच्या गेल्याची तक्रार दिली आहे.